विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावरदेवेंद्र फडणवीसच विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, आज पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यानंतर आता भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पडळकर म्हणाले, "आज माझ्या एकट्याच्या नव्हे तर, महाराष्ट्रातील गाव गाड्यातील जो शेतकरी आहे, कष्टरी आहे, उपेक्षित आहे, बहुजन आहे, सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. 2019 ला ज्या जनतेने दवेंद्र फडणवीस यांना बहुमत दिले होते, त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते, मजेत होते त्यांना 2024 ला जनतेने राजकारणातून बाहेर काढले आणि पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस उद्या विराजमान होत आहेत, याच्या सारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही."
पडळकर पुढे म्हणाले, "ज्या व्यक्तीमत्वाला गेली पाच वर्ष अपमानित केलं गेलं, त्यांच्यावर टीका केली गेली, प्रचंड जातियवाद केला गेला, त्या सर्वांना महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले आहे. माझ्यासाठी आजचा दिवस खूप-खूप आनंदाचा दिवस आहे." एवढेच नाही तर, "महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा आणि उद्याचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल," असे पडळकर म्हणाले.