मुंबई- मुंबईत शिवसेना महागाईविरोधात रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेचे मुंबईतील 12 ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. मुंबईतील रस्त्यावर उतरून निदर्शनं करणाऱ्या शिवसेनेवर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या नावाने निवडून आले आणि सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींविरोधात घोषणा देत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. ट्विट करून आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.
शिवसेनेने भाजपा सरकारविरोधात आक्रमक होत आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. शनिवारी सकाळापासून मुंबईत ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, निलम गोर्हे, किशोरी पेडणेकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला. नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय'', अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून देण्यात आली. ''एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला'', अशा घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी अक्षरशः टोक गाठल्याचे यावेळी पाहायला मिळालं.
शिवसेनेच्या आंदोलनावर आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला. जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवरही बसले तेच आज मोदींच्या विरोधात घोषणा देतात. ज्या माणसाच्या जिवंतपणी मृत्यूच्या घोषणा दिल्या जातात. तो दिर्घायुषी होतो, असं म्हणतात. पण नवरात्रीत ‘शिमगा’ करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही टीका केली आहे. एकही निवडणूक लढवण्याची औकात नाही, अशांनी माझ्यासारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधीवर बोलू नये. कुणाच्या पायर्या चाटत राजकारणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही, अशा शब्दात आशिष शेलार यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, आशिष शेलार यांच्या या टीकेवर अनिल परब यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे, त्याच्या पायऱ्या धुवायची आणि चाटायची माझी तयारी आहे. महापालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो. आम्ही आजपर्यंत कधीही खाल्ल्या ताटात घाण केली नाही’, असं परब यांनी म्हटलं आहे. ‘आशिष शेलार हे मातोश्रीच्या पायऱ्या चाटत चाटत आले आहेत. २०१४ मधील निवडणुकीपूर्वी शेलार तासनतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे हे विसरु नये, असं म्हणत अनिल परब यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.