महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!

By यदू जोशी | Published: June 18, 2024 05:50 AM2024-06-18T05:50:36+5:302024-06-18T05:51:11+5:30

जिथे अजित पवारांचे आमदार तिथे भाजप, शिंदेंना मोठा फटका.

Those who say they dont want a third friend in the Grand Alliance get strength in the BJP | महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!

महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अजित पवार गटाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवर आहेत. आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय? असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणणे सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर आदी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजप, शिंदेसेनेच्या उमेदवारांना फटका बसला.

मावळमधील शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे जिंकले; पण त्यांनी अजित पवार गटाने सहकार्य केले नसल्याची तक्रार जाहीरपणे केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिंदेसेनेमधील काही नेत्यांनी अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी आपापल्या पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची मते भाजप, शिंदेसेनेकडे वळली नाहीत, असा तर्क आकडेवारीच्या आधारे दिला जात आहे

सोलापूर, माढा मतदारसंघात असे कसे घडले...

- सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी ७४ हजारांवर मतांनी पराभव केला, मोहोळ विधानसभेत अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत. या मतदारसंघात सातपुते हे ६३,१५२ मतांनी पिछाडीवर आहेत.

- माढा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर हे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून १ लाख २० हजारांवर मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात संजय शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. तेथे निंबाळकर हे ४१,५११ मतांनी मागे आहेत. आहेत. माढ्याचे बबनराव शिंदे आमदार आहेत. तिथे निंबाळकर हे ५२, ५१५ मतांनी पिछाडीवर आहेत. फलटणमध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत, तिथे निंबाळकर यांना १६,९२८ मतांचे अधिक्य असले तरी तिथे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने भाजपच्या विरोधात काम केल्याचे जाहीरपणे बोलले गेले.

चार आमदार असताना फटका

शिरूरमधील खेड विधानसभा मतदारसंघ- दिलीप मोहिते पाटील, जुन्नर - अतुल बेनके, आंबेगाव- दिलीप वळसे पाटील आणि हडपसर - चेतन तुपे हे अजित पवार गटातील आमदार आहेत. या चारही मतदारसंघांत शिंदेसेनेचे आढळराव पाटील हे मागे राहिले. कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, स्वतः शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि समरजित घाडगे यांचा गृहविधानसभा मतदारसंघात १५ हजारांचे मताधिक्य मंडलिक यांना मिळाले.

केंद्रीय मंत्र्यांचाही झाला पराभव

- दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार १,१३,१९९ मतांनी पराभूत झाल्या. या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्या सगळ्यांच्या मतदारसंघात भारती पवार पिछाडीवर आहेत. कळवण-सुरगणा या गटाचे नितीन पवार आमदार आहेत आणि तिथे भारती पवार ५७,६८३ मतांनी मागे आहेत.

- मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात त्या १३ हजारांवर मतांनी मागे आहेत. निफाडमध्ये याच गटाचे दिलीप बनकर आमदार आहेत तिथे पवार १८ हजार मतांनी माघारल्या. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी मतदारसंघात भारती पवार यांना शरद पवार गटाचे विजयी उमेदवार भास्कर भगरे यांच्यापेक्षा ८२ हजार मते कमी आहेत.

नांदगाव विधानसभेत शिंदेसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत आणि तिथे ४१,६६५ मतांचे अधिक्य आहे. चांदवडमध्ये भाजपचे राहुल आहेर आमदार असून तिथे १६ हजारांवर मतांनी आघाडीवर राहिल्या.

Web Title: Those who say they dont want a third friend in the Grand Alliance get strength in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.