मुंबई: ‘बोरीवलीतील २४ क्रमांकाचे कोर्टरूम न्यायाधीशांसह उडवून देणार,’ अशी धमकी देणाऱ्या संदीप बेरियाला (५२) दहशतवाद विरोधी पथकाच्या चारकोप युनिटने मंगळवारी अटक केली. चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या बेरियाला तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती, त्यातूनच हा प्रकार केल्याची कबुली त्याने तपास अधिकाऱ्यांकडे दिली.बेरिया हा नालासोपारा येथील रहिवासी असून, ग्रँटरोड परिसरात एका थिएटरसमोर तो चित्रपटाची तिकिटे ब्लॅकने विकतो. त्याच्याविरुद्ध तोतया पोलीस बनून लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे मालाड आणि व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. एका प्रकरणाची सुनावणी बोरीवली कोर्टात सुरू आहे. त्या प्रकरणात त्याला लवकरची तारीख न्यायधीशांनी दिली होती. त्यामुळे आता शिक्षा होणार अशी भीती त्याला वारंवार सतावत होती. त्यामुळे न्यायधीशांवर राग होता. ग्रँटरोडच्या पीसीओवरून त्याने नियंत्रण कक्षास धमकी दिली, असे चारकोप एटीएस युनिटचे प्रमुख सुभाष सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. फोनवर त्याने संबंधित न्यायधीशांचे नावही घेतले. (प्रतिनिधी)
कोर्टरूम उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक
By admin | Published: April 27, 2016 2:38 AM