ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मासंबंदीच्या वादावर आमच्याकडून पडदा पडला असून ज्यांना कोणाला त्यांचा धर्म पाळायचा आहे तो त्यांच्या घरी पाळावा, दुस-यांवर स्वतःच्या धर्माची जबरदस्ती करु नये अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ठणकावले आहे. दरवर्षी पर्युषणादरम्यान २ दिवस मांसविक्रीवर बंदी असते, मग यंदाच हा वाद अचानक का उफाळून आला असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी भाजपाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
मांसविक्री बंदीच्या वादासंदर्भात रविवारी जैन साधूंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या वादावर आमच्याबाजूने पडदा पडला आहे असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मीरा भाईंदर, नवी मुंबई व मुंबई महापालिकेत पर्युषणा दरम्यान मांसविक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांकडून सुरु होता. यावरुन शिवसेना, मनसेसह सर्वच राजकीय पक्षांनी भाजपावर टीकेची झोड उठवली होती. उद्धव ठाकरेंनी या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केल्यावर भाजपा व शिवसेनेत सुरु असलेली धुसफूस संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत.