मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवारांनी केलेलं बंड महाविकासआघाडीच्या सरकार स्थापनेला सुरुंग लावणारं ठरले होते. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी बाजारात अनेक आमदार आहेत, एक दोन आमदार राष्ट्रवादीत गेल्याने फरक पडत नसल्याचे म्हटले होते. यावर आज नितेश राणेंना विचारले असता त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, बाजारात अनेक आमदार आहेत, काही येणार आहेत काही सीमेवर आहेत. महाराष्ट्रात जे काही घडलं तो भूकंप नसून ही गोष्ट घडणार होती. भाजपा सरकार बनविणार असं मी आठवडाभरापूर्वी सांगितलं होतं. हे सरकार ५ वर्ष टिकेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दोघंही अनुभवी नेते, याचा फायदा भाजपाला अन् जनतेला होईल असं त्यांनी सांगितले होते.
यावर नारायण राणे अपयशी ठरले का, असा प्रश्न बीबीसीकडून विचारण्यात आला. तेव्हा शपथविधीहून विधिमंडळाच्या आवारात आलेल्या नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आधी आम्ही प्रश्न विचारायचो त्याचे उत्तर मातोश्रीवरून येत नव्हते. आता त्यांना उत्तरे द्यावीच लागतील, असा टोला लगावला आहे. याचबरोबर अजित पवार कौटुंबिक दबावामुळे मागे गेले असतील. पण आधी जे संपर्कात होते ते आजही आहेत. पुढील काळात गरज पडेल तेव्हा ते दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तसेच निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या त्यांच्याच वक्तव्याबाबत छेडले असता नितेश यांनी आता खांदा शोधतोय असे मिश्किल उत्तर दिले. खांदा गर्दीत शोधतोय, असे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तरुण नेत्यांचीही नावे घेतली. इथे विश्वजित कदमांचाही खांदा आहे, सिद्धिकीचाही आहे, रोहित पवारचाही खांदा आहे, ज्याचा मिळेल त्याच्यासोबत काम करेन, असे ते म्हणाले.