ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा जाहीर करुन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे मनसुबे उधळून लावले असतानाच भाजप नेते एकनाथ खडसे यांनीही रविवारी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री हे युतीचे सूत्र असून यंदाच्या निवडणुकीतही हेच सूत्र यंदाही कायम राहील' अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंपत्रीपदाची जबाबदारी आल्यास पळ काढणार नाही असे विधान केले होते. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी तयारी केली असतानाच उद्धव ठाकरेंनी भाजपला मुख्यमंत्री शिवसनेनेचाच असा इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. यावर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. '२५ वर्षांपासून ज्याचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री हे युतीचे सूत्र आहे. यंदाच्या निवडणुकीतही हेच सूत्र कायम आहे असे खडसे यांनी सांगितले. जागा वाटपावर चर्चा सुरु असून लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीतील घटकपक्षांचे समाधान झाले आहे असा दावाही खडसे यांनी केला.
विधानसभेसाठी मतदानाला अवघा महिनाभराचा कालावधी उरला असतानाच शिवसेना भाजप महायुतीतील जागावाटपाचा वाद अद्याप निकाली निघालेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी रात्री शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेते राजीवप्रताप रुडी यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसत आहे.