बीड - बीड जिल्हा पोलीस दलातील एका २७ वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदलाची परवानगी मागितल्याने राज्यात खळबळ उडाली होती. तीन दिवस हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिका-यांपुढे निर्णयास्तव विचाराधीन होते. अखेर शनिवारी रात्री उशिरा पोलीस महासंचालकांनी बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना लिंगबदलाची परवानगी नाकारल्याचे पत्र पाठविले आहे.क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या पोलीस दलातील महिलेने श्रीधर यांच्याकडे चार दिवसांपूर्वी एका अर्जाद्वारे लिंग बदलण्यासाठी परवानगी मागितली होती. असे प्रकरण पहिल्यांदाच असल्याने श्रीधर यांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला. त्यांच्याकडूनही याबाबत निर्णय न झाल्याने प्रकरण पोलीस महासंचालकांकडे गेले. दोन दिवस विचारविनिमय झाला. शनिवारी रात्री परवानगी नाकारल्याचे पत्र बीड पोलीस अधीक्षकांना महासंचालक यांच्याकडून मिळाले. त्यामुळे आता ही महिला पोलीस कर्मचारी न्यायालयात जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तिचा भ्रमणध्वनी बंद असल्याने प्रस्तुत प्रतिनिधीचा संपर्क होऊ शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सदरील महिला पोलीस मुंबईमध्ये न्यायालयीन कामकाजासाठी गेल्याचे सांगण्यात आले. परंतु अधिकृत दुजोरा मिळाला नाही.पुरुष होण्याचे स्वप्न अर्धवटमागील अनेक वर्षांपासून ही महिला पोलीस पुरुषांसारखी राहत होती. तिचे हावभाव, भावनाही पुरुषांसारखे आहेत. तसेच तिला स्वत:लाही आपण स्त्री नसून, पुरुषच असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तिने अधीक्षकांकडे धाव घेऊन लिंग बदल करुन पुरुष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु महासंचालकांनी हा अर्ज फेटाळून लावल्याने तूर्त तरी तिचे पुरुष होण्याची स्वप्न अर्धवटच राहिले.नोकरी नको, लिंग बदल हवापोलीस अधीक्षकांकडे एकवेळ पोलीस नोकरी गेली तरी चालेल, परंतु आपण लिंग बदल करणारच, असे सांगितले होते. त्यामुळे महासंचालकांनी परवानगी नाकारल्यानंतर त्या महिला पोलिसची पुढची भूमिका काय असेल? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पोलीस महासंचालक यांच्याकडून लिंग बदल अर्जावर विचार होऊन परवानगी नाकारल्याचे पत्र आम्हाला मिळाले आहे.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड.
‘त्या’ महिला पोलिसास लिंग बदलाची परवानगी नाकारली, पोलीस महासंचालकांचे बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 10:44 PM