लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ विचारांची भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली असली, तरी आजही हिंदुत्वनिष्ठांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याची खंत हिंदू जनजागृती समितीने गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. प्रशासनातील उद्दामपणा आणि भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे मत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी या वेळी व्यक्त केले.वर्तक म्हणाले की, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करताना संघटक आणि कार्यकर्ते यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करता यावी; तसेच अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी १९ ते २१ जून या कालावधीत गोव्यातील बांदिवडे येथे ‘हिंदू राष्ट्र संघटक’ निर्मितीचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.समितीचे प्रवक्ते उदय धुरी म्हणाले की, काश्मीरचा विषय आजही जखम बनून राहिला आहे. जवानांवरील दगडफेक, त्यांच्या हत्या आजही रोखता आलेल्या नाहीत किंवा जवानांवरील दगडफेक हा राजद्रोह ठरवला जात नाही. काश्मिरी हिंदू पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. समान नागरी कायदा व श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण विषयांवर सरकार भूमिका घेताना दिसत नाही, असा घरचा अहेरही धुरी यांनी भाजपाला दिला.अखिल भारतीय हिंदू अधिवेशन गोव्यात!हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी १४ ते १७ जून या कालावधीत गोव्यातील फोंडा येथील रामनाथ देवस्थानमध्ये अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडणार आहे. यंदा अधिवेशनाचे सहावे वर्ष असून, त्यात देशातील २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील १५०हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी सामील होणार आहेत. या अधिवेशनात मंदिरांचे रक्षण, गो-रक्षण, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, बांगलादेशींची घुसखोरी या विषयांवर कृती कार्यक्रम आखला जाईल.
हिंदुत्ववादी असले, तरी भाजपा उद्दाम व भ्रष्ट!
By admin | Published: June 09, 2017 2:21 AM