पुणे : प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आणि सततच्या अपघातांमुळे चर्चेत राहिलेल्या शिवशाही बसचा ताफा आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच आणखी एक हजार शिवशाही बस येणार आहेत. त्यातील सुमारे ६०० बस एसटीकडून विकत घेतल्या जाणार आहेत.एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे एक हजार वातानुकूलित शिवशाही बस आहेत. त्यापैकी ५०० बस एसटीच्या मालकीच्या आहेत. तर उर्वरीत बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही बस शयनयान सुविधा असलेल्या आहेत. शिवशाही व्यतिरिक्त वातानुकूलित शिवनेरी, हिरकणी निमआराम, यशवंती मिडी, शितल निमआराम, वातानुकूलित अश्वमेध आणि साधी अशा विविध प्रकारच्या बस आहेत. जुलै २०१७ मध्ये शिवशाही बस दाखल झाल्या. तेव्हापासून या बसला प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही बस सततच्या अपघातांमुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत शिवशाहीचे २४० अपघात झाले. त्यामध्ये ८४ बस भाडेतत्वावरील होत्या. एकुण अपघातांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला तर २९१ प्रवासी जखमी झाले आहे. त्यानंतर एसटी प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसटी प्रशासनाने आणखी शिवशाही घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीकडून खरेदी केल्या जाणाऱ्या सुमारे ६०० बसची निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. या बस एप्रिल अखेरपर्यंत ताफ्यात दाखल होतील. तर भाडेतत्वावरील ४०० बसची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याही बस लवकरच मिळतील. या सर्व बस वातानुकुलित आसनी श्रेणीतील असतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.----------सध्या शिवशाही बस - मालकीच्या - ५००भाडेतत्वावरील - ५००------------नियोजित शिवशाही बस -मालकीच्या - ६००भाडेतत्वावरील - ४००
एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आणखी एक हजार शिवशाही बस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 11:37 AM
एसटीच्या ताफ्यात सध्या सुमारे एक हजार वातानुकूलित शिवशाही बस आहेत.
ठळक मुद्देप्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता एसटी प्रशासनाने आणखी शिवशाही घेण्यास दिली मंजुरी सर्व बस वातानुकुलित आसनी श्रेणीतील ; एप्रिल अखेरपर्यंत ताफ्यात होतील दाखल