ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - - आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने अमेरिकन इंडिया फाउंडेशनसोबत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी बीएस्सीआयटी उत्तीर्ण २५० विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचे मोफत प्रशिक्षण मिळेल, असे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले. तसेच लवकरच हा आकडा हजारोंच्या घरात जाईल, असेही देशमुख म्हणाले.
मुंबई विद्यापीठाची गरवारे व्यवसाय शिक्षण संस्था आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्यामध्ये नुकताच महत्वपूर्ण शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील फिरोजशहा मेहता व्यवस्थापन परिषदेच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला. या करारान्वये अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या मदतीने गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील होतकरु तरुण विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमूख प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत करण्याच्या हेतूने या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे.
अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ही एक चॅरिटॅबल ट्रस्ट असून या संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमुख शिक्षण देण्यास मदत करीत असते. या करारान्वये गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, सॉफ्टवेअर टेस्टींग आणि पेंट केमिस्ट असे तीन अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. गरवारे व्यवसाय शिक्षण संस्था या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.