मंचर : बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळताच ‘बैल उधळला’. बैलगाडामालकांनी शर्यतीचे बैल खरेदी करण्यासाठी शोधाशोध सुरू झाली आणि बंदीनंतर हजारांवर गेलेला भाव एका दिवसात लाखावर गेला. शर्यतीवर बंदी येऊन दीड वर्ष झाले आहे. या दरम्यान शर्यतींच्या बैलांच्या किमती कोसळल्या. लाख रुपयांचा बैल १० ते २० हजारांना मिळत होता. तरीही त्याला कोणीही खरेदी करीत नव्हते. तो शेतीकामासाठी उपयोगी पडत नाही. तो केवळ शर्यतीत पळण्याचे काम करतो. त्यामुळे ‘बंदी’च्या काळात धावणाऱ्या बैलाला कामच राहिले नव्हते. तो जागेवर बांधून होता; शिवाय वर्षभरात कुठल्या शर्यतीत पळाला नसल्याने, त्याचा सराव मोडला होता. मालक केवळ प्रेमापोटी या बैलांचा सांभाळ करीत होता. काही बैलगाडामालकांनी शर्यतीच्या बैलांना शेतीला जुंपून पाहिलेही; मात्र उपयोग झाला नाही. सकाळी शर्यतीवरील बंदी उठल्याची बातमी पसरली व बैलांच्या किमती अचानक वाढल्या. दोन दिवसांत घाटात भिर्रर्र आवाज घुमेल, त्या वेळी धावणाऱ्या बैलांचा शोध घेण्यासाठी बैलगाडामालकांची शोधाशोध सुरू केली. चांगला बैल कोठे आहे, काय किंमत मिळेल, याची चर्चा पारावर रंगली आहे. यापूर्वी शर्यतीच्या बैलाला सर्वाधिक २१ लाख रुपये भाव मिळाला होता; मात्र आता बैलगाडा मालकांना असणारा उत्साह पाहता, आता बैलांच्या खरेदी-विक्रीत उच्चांक होणार आहे. अनेक बैलगाडामालकांनी अडगळीत पडलेले बैलगाडे आज बाहेर काढले. जू, गाडी, जुंपव्या यावर बऱ्याच दिवसांनी शेतकऱ्यांनी हात फिरवला. (वार्ताहर)
हजारांचा बैल दिवसात लाखावर!
By admin | Published: January 09, 2016 1:40 AM