ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. १८- पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याने जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५६0 पतसंस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील हजारो पतसंस्थांवर आर्थिक मंदिचे सावट निर्माण झाले असून, जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांची मिळून कोटींची उलाढाल थंडावली असल्याने पतसंस्थेतील ठेवीदारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सहकारी पतसंस्था जवळपास १ हजार ५६0 आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २५४, चिखली तालुक्यात २२३, देऊळगाव राजा ७४, सिंदखेडराजा ६६, लोणार ६0, मेहकर १४२, खामगाव १६0, शेगाव ११२, संग्रामपूर ४४, नांदुरा ११६, जळगाव जामोद ६१, मलकापूर ११९, मोताळा तालुक्यात १२९ पतसंस्था आहेत. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेत दररोज लाखो रुपयांचा भरणा होतो. यामध्ये दैनंदिन बचत ठेवीचे पैसे अधिक आहेत. तसेच शेतकरी, व्यावसायीक यांची मदार पतसंस्थेवरच आहे. परंतू चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, तसेच अशा नोटा घेण्यास पतसंस्थांनी नकार दिल्याने आता दररोज केवळ लाखो रुपयांऐवजी केवळ हजारो रुपयेच पतसंस्थेत जमा होत आहेत. चलनातून पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने पतसंस्थेची आर्थिक उलाढाल थंडावली आहे. मजूर, विक्रेते, शेतकर्यांची बचत, ठेव खाती, पतसंस्थेत आहेत. त्यांचे पैसे जमा होत नाहीत. आता कर्जवसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकारी पतसंस्थांमध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे. पतसंस्थांवर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्विकारणे बंद केल्याने पैशांच्या तुटवडा निर्माण झाला आहे. नोटा बंद केल्यानेत्यामुळे पतसंस्थेतील गुंतवणूक भरणा यावर मोठा परिणाम झाला असून, पतसंस्थेवर आर्थिक मंदिचे सावट निर्माण झाले आहे. पतसंस्थांचे लाखोंचे व्यवहार हजारावर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंदचा जिल्ह्यातील हजारो पतसंस्थांना फटका बसला आहे. पतसंस्थामध्ये १00 किंवा ५0 रूपयांच्या नोटा घेऊन येणार्या लोकांचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. मात्र, ५00 किंवा एक हजार रूपयांच्या नोटा पतसंस्था स्वीकारत नसल्याने पतसंस्थांचे लाखोंचे व्यवहार हजारावर येवून ठेपले आहेत. सोनेतारण व्यवहाराला मोठा फटकापाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदीचा सोनेतारण व्यवहाराला मोठा फटका बसला आहे. पतसंस्थांमध्ये लाखो रूपयांचे सोनेतारण कर्ज दिले जाते; परंतू सध्या मोठ्या रक्कमेअभावी ही कर्ज प्रकरणे बंद झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांकडे अद्याप नव्या चलनातील मोठी रक्कम आली नसल्याने पतसंस्थामध्ये पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पतसंस्थेतील सोनेतारण व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच पतसंस्थाना नागरिकांना २ हजार रुपये देणेही अवघड झाले असल्याने पतसंस्थेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. -जिल्ह्यातील सर्व पतसंस्था मिळून कोटींची उलाढाल होते. परंतू अचानक पाचशे व एक हजारच्या नोटा बंद केल्याने पतसंस्थानी स्टेट बँक व अर्बन बँकेत सर्व पैसा जमा केला. त्यामुळे पंतसंस्था सर्वसामान्यांना २ हजार रुपये सुद्धा देवू शकत नाही. यामुळे गरीबांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, पतसंस्थांना त्यांचे पैसे १00 व २ हजार रुपये चलनात परत केल्यास अर्थववस्था सुरळीत होईल. श्याम उमाळकर, अध्यक्ष, सत्यजीत अर्बन सोसायटी, मेहकर.
पतसंस्थांची कोटींची उलाढाल थंडावली!
By admin | Published: November 18, 2016 6:47 PM