मुंबई : गणेशोत्सवामुळे पेढे आणि मोदकांची मागणी वाढत असल्यामुळे मावासदृश पदार्थाची आयात केली जात आहे. त्या पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, शुक्रवारी एफडीएने केलेल्या कारवाईत ५ हजार ७०० किलो नकली मावा जप्त करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी या काळात मोदकांची मागणी वाढते. त्याचबरोबर पेढे, बर्फी अशा गोड पदार्थांचीही मागणी वाढल्याने माव्याची मागणी वाढते. मागणी वाढल्यावर अनेकदा बाजारात भेसळीयुक्त माल आणला जातो. सध्या मोदकासाठी दूध घोटून तयार केल्या जाणाऱ्या माव्याची मागणी वाढली आहे. पण, त्याऐवजी मावासदृश पदार्थ बाजारात आला आहे. हा नकली मावा गुजरातहून आणला आहे. गुजरातहून नकली मावा आणला गेल्याची माहिती एफडीएच्या दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानुसार बोरीवली येथील रायडोंगरी परिसरातील नामदेव कदम चाळीतील रूम नंबर ३मध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. त्यात ५ हजार ७०० किलो मावा जप्त करण्यात आला. याची किंमत ९ लाख ११ हजार ४० रुपये इतकी आहे. या प्रकरणी मोहनसिंग रोडासिंग राजपूत याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहनसिंग याच्याकडे खाद्यपदार्थ विक्रीसाठी लागणारा आवश्यक परवाना नसल्याचेही या तपासात उघड झाले. (प्रतिनिधी)सतर्क राहा! खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केल्यास अथवा कमी दर्जाचे पदार्थ आणल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. नकली माव्यामुळे विषबाधा होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे ग्राहकांनी मोदक, पेढे घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. नकली मावा ओळखता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी चांगल्या दुकानातून पेढे, मोदक घ्यावेत, असे आवाहन एफडीएने केले आहे.
साडेपाच हजार किलो नकली मावा जप्त
By admin | Published: September 04, 2016 1:40 AM