नाशिक : राज्यातील बहुचर्चित व मोक्कान्वये गुन्हा दाखल झालेल्या वाडीवऱ्हे रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासाबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी ग्रामीण पोलिसांवर कडक ताशेरे ओढल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़ घोटाळ्याचा मास्टरमार्इंड जितूभाई ठक्कर पोलिसांना सापडत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़उर्वरित चौघा संशयितांविरोधात महिनाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे़ तपास अधिकाऱ्यांनी आॅक्टोबरमध्ये घोटी येथील संशयित दीपक श्रीश्रीमाळ व अन्य एकास अटक केली होती़ त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ मात्र, नंतर श्रीश्रीमाळ यास कोर्टात हजर केल्यानंतर तपासात प्रगती न आढळल्याने तसेच दोषारोपपत्र दाखल केले. परंतु काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच मुद्देमाल हजर न केल्याबाबत न्यायालयाने तपास पद्धतीवर चांगलेच ताशेरे ओढले होते़ संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर संबंधित तपास अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्याने तपास पुन्हादुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे़ जितूभाई ठक्करकडून माल घेणे व त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे काढण्याचे काम श्रीश्रीमाळ करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़ ठक्कर १७ महिन्यांपासून फरार आहे. त्याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला असून संथपणे तपास करून पोलीस त्यास अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याची चर्चा आहे़पोलिसांनी संशयित अरुण घोरपडे, संपत घोरपडे, विश्वास घोरपडे, मगन पवार, रमेश पाटणकर, काशीनाथ पाटील, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, जितेंद्र ठक्कर, पूनम होळकर, गुदामपाल संजय कचरू वामन,अश्विन जैन व प्रकाश शेवाळे असे एकूण १३ आरोपी निश्चित केले आहेत. (प्रतिनिधी)
धान्य घोटाळ्याच्या तपासावर ताशेरे
By admin | Published: November 09, 2016 5:55 AM