नागपूर : दिवाळी हा उत्साहाचा सण. अनेकजण फटाके फोडून आनंद साजरा करतात. परंतु काहीजण फटाके फोडताना खबरदारी घेत नसल्याने आनंदाऐवजी त्यांना दु:खदायक घटनेला समोर जावे लागते. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण कमी झाले असलेतरी रविवारी फटाके फोडत असताना शंभरावर लोक जखमी झालेत. यातील एका रुग्णाची दृष्टी गेली.फटाके फोडताना आवश्यक गोष्टींची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे न झाल्यास अनेकांची दिवाळी अंधारात जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रविवारी फटाक्यांमुळे हात व इतर भागातील त्वचा जळलेले सहावर रुग्ण तर फटाक्यांची बारुद, कचरा डोळ्यात गेलेल्या आठ रुग्णांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) फटाक्यांमुळे भाजलेल्या १३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील अंजली चौधरी ही पाच वर्षीय मुलगी गंभीर असल्याने तिला वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. शहरातील विविध खासगी इस्पितळातही रविवारी रात्री उशिरापर्यंत भाजलेल्या ७० वर रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी) >खासगी इस्पितळातही गर्दीफटाक्यांमुळे जखमी झालेल्या रुग्णांनी दंदे हॉस्पिटल, आॅरेंज सिटी हॉस्पिटल, क्रिम्स हॉस्पिटलसह शहरातील विविध खासगी इस्पितळात उपचार घेतला. डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले की, रविवारी १२ रुग्णांवर उपचार केले. यात लहान मुलांची संख्या मोठी होती. यात एकाच्या हातात अनार फुटल्याने हात जळला. काहींच्या डोळ्यांना जखम झाली होती तर काहींची त्वचा भाजली होती. या सर्वांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले, असेही ते म्हणाले. डॉ. अनुप मरार यांनी सांगितले, इस्पितळात फटाक्यांमुळे जखमी झालेल्या चार वर्षाच्या मुलापासून ते ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने उपचार घेतला. हातातच फुटला फटाकामेडिकलमध्ये आठ दिवसांपूर्वी एका १५ वर्षीय युवकाच्या हातातच सुतळी बॉम्ब फुटला. त्याच्या हाताच्या दोन बोटाच्या चिंधड्या उडाल्या तर डाव्या डोळ्यात फटाक्याचे बारीक कण शिरले. त्याला जखमी अवस्थेत मेडिकलमध्ये आणण्यात आले. नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले की, युवकाच्या डोळ्यात खोलवर फटाक्याचे कण शिरले होते. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली. परंतु दृष्टी वाचविता आली नाही.
फटाक्यांमुळे शंभरावर जखमी
By admin | Published: November 01, 2016 5:33 AM