राहुल ओमने, शिराढोण (जि. उस्मानाबाद)कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून, त्यावर १८० मजूर काम करीत आहेत. त्यामुळे येथील जवळपास ६०० तर लमाणतांडा वस्तीवरील ४०० मजुरांनी गाव सोडले आहे. त्यात युवकांचे प्रमाण अधिक आहे.मोठी बाजारपेठ असण्याबरोबरच जिल्ह्यात सर्वात मोठा तब्बल ५ हजार २०० हेक्टरचा शिवारही याच गावाचा आहे. गावात सुमारे तीन हजार शेतमालक आहेत. सोयाबीन हे नगदी पीक येथे केले जाते. तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. एकरभर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास २० हजारांचा खर्च येतो, परंतु चाळीस गुंठ्यात पन्नास ते साठ किलोचा उतारा आल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही. जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. येथील सुमारे दोन हजार जनावरांना दररोज १३ हजार ५९६ किलो चाऱ्याची आवश्यकता आहे. दरवर्षी सोयाबीन, भुस्कट व ज्वारीचा उपलब्ध होणारा कडबा यंदा खरीप व रबी हंगामही हातचा गेल्याने मिळाला नाही. चाऱ्याचा प्रश्न बिकट झाल्यानंतरही परिसरातील १५ गावांत एकही चारा छावणी सुरू झाली नाही. त्यामुळे पशुपालक जनावरे बेभाव विकत आहेत. रोहयोची १९२ रुपये प्रमाणे मिळणारी मजुरीही काही ठिकाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.तीन एकर शेतीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालते. तीन वर्षांपासून शेतीचा खर्चही न निघाल्याने आता भाजीपाला व्यवसाय सुरू केला. रोजचा खर्च भागविण्याएवढे उत्पन्न आता मिळत आहे. - मधुकर देशमुख, शेतकरीगतवर्षी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही खर्च वाया गेला. पाणी नसल्याने बागायती पिके घेतली नाहीत. कुठे मजुरीचे कामही मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाला दोन वेळचे खायला घालणेही मुश्कील होत आहे.- राजाभाऊ व्होनमाने, शेतकरी
हजारावर मजुरांनी सोडले गाव!
By admin | Published: April 20, 2016 5:50 AM