महाड :
पारंपरिक वेशभूषेतील हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ३४९ तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी तुतारींतून निघालेल्या ललकारी, ढोलताशांचा गजर आणि विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रांच्या घोषात वरूणराजानेदेखील हजेरी लावल्याने तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे ३४९ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. पावसाळी वातावरणात हजारो शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात या सोहळ्याला हजेरी लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात रायगडाची गडदेवता शिरकाई मातेच्या पूजनाने करण्यात आली. मेघडंबरी फुलांनी सजविली होती. पहाटे ध्वजारोहण सोहळा व श्री शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. गडावरील विविध देवी-देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी शिवरायांच्या मूर्तीची पालखी काढली. खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, सुनील पवार, सुरेश पवार उपस्थित होते.
मर्दानी खेळांचे केले सादरीकरण पावसाचा गारवा व दाट धुक्यातही शिवप्रेमींमधील अलोट उत्साह दिसत होता. राज्याभिषेकानंतर हलगी, ढोलताशे, लेझीम, मृदंगाच्या वाद्यात, शिवजयघोषात शिवप्रेमींच्या उत्साहात शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक राजसदरेहून होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशी मार्गस्थ झाली. होळीच्या माळावर दांडपट्टे, लाठीकाठी, तलवारबाजीच्या मर्दानी खेळाबरोबरच लेझीमचेही सादरीकरण करण्यात आले.