पुणे : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यापासून काळे पैसेवाल्यांची बोबडी वळाली आहे. कुणी नोटा फाडून टाकल्या, कुणी जाळल्या, कुणी खिरापतीसारख्या वाटल्या, अशा बातम्या देशभरातून येत असताना लॉ कॉलेज रस्त्यावरच्या कांचनगल्लीमध्ये कचऱ्यामध्ये हजार रुपयांच्या ५२ नोटा सापडल्या. कचरा वेचणाऱ्या महिलेने या नोटा पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.
शांताबाई ओव्हाळ या लॉ कॉलेज रस्ता आणि प्रभात रस्ता परिसरात कचरा उचलण्याचे काम करतात. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ओव्हाळ कचरा गोळा करुन त्यातील ओला व सुका कचरा वेगळा करीत होत्या. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये एक हजारांच्या तब्बल ५२ नोटा आढळून आल्या. या नोटा पाहिल्यानंतर गोंधळलेल्या ओव्हाळ यांनी मनपाचे मुकादम खंडू कसबे यांना बोलावून माहिती दिली. या नोटा नेमक्या कोणी आणि कधी कचऱ्यामध्ये टाकल्या याचाही शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी ओव्हाळ आणि कसबे यांचे जबाब नोंदवले आहेत. या भागातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून तपास सुरूकसबे यांनी या नोटा पाहिल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही या नोटा तपासून पाहिल्या. कचऱ्यात नोटा सापडल्याची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नोटा ताब्यात घेतल्या. या नोटा प्रभात चौकीमध्ये नेण्यात आल्या. कचऱ्यामध्ये पडलेल्या असल्यामुळे या नोटा घाण झालेल्या होत्या. यासोबतच काही नोटा भाजीमध्ये भिजलेल्या, तर काही नोटा चुरगळलेल्या अवस्थेत होत्या. पोलिसांनी या नोटा स्वच्छ करुन सुकवल्या. नोटा खऱ्या आहेत की खोट्या याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.