- चेतन ननावरेमुंबई : एसटी महामंडळातील हजारो चालक व वाहक मतदानादिवशीही कर्तव्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असतात. परिणामी, संबंधित कर्मचाºयांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असून यामध्ये निवडणूक आयोगाने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी एसटी कामगार सेनेने केली आहे. त्यावर एसटी कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोगाला य़ोग्य तो मार्ग काढण्याचे आवाहन करू, अशी प्रतिक्रिया मुंबई शहराचे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केली आहे.
एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर म्हणाले की, निवडणूक कामानिमित्तही एसटी कर्मचाºयांना मतदानाच्या चार दिवसआधी कळवले जाते. त्यामुळे बहुतेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहतात. याशिवाय लाखो प्रवाशांना सेवा देण्यासाठी हजारो चालक व वाहक मतदानादिनी एसटीच्या फेºया घेऊन जिल्ह्याबाहेर असतात. रात्री उशीरा किंवा पहाटे निघालेले कर्मचारी दुसºया दिवशी घरी परतात. परिणामी, त्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. याउलट मतदान यंत्रापासून निवडणूक कामासाठी असलेल्या कर्मचाºयांची वाहतूक करण्याचे कामही बहुतेक चालक व वाहकांना करावे लागते. संबंधित कर्मचाºयांनाही कामामुळे मतदान करता येत नाही. या सर्व चालक व वाहकांसाठी निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी विशेष यंत्रणा राबवण्याची गरजही रेडकर यांनी व्यक्त केली.
एसटी कर्मचाºयांचे मुख्यालय मुंबईत असल्याने नक्कीच या बाबत निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच एसटी कर्मचाºयांना मतदानादिनी त्याच विभागातील सेवा देण्यासंदर्भात आयोगासह एसटी महामंडळाला कळवण्यात येईल, असेही जोंधळे यांनी सांगितले.