सोलापूर/ मंगळवेढा : भाजप सरकारने मागील पाच वर्षात फक्त आश्वासनांची घोषणाबाजी केली. दुष्काळाचा सामना करणाºयांना शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करीत शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले. शेतीच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकºयांवरील कर्जाचा डोंगर वाढला. त्याच नैराश्येतून राज्यातील १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे राज्यातील १६ हजार आयाबहिनी विधवा झाल्याची खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पाच वर्षात सरकारनं शेतकºयांना मातीत घालण्याचे काम केले़ शेतकºयांना दिलासा देण्याऐवजी पाकिस्तानमधून साखर, कांदा आयात करण्यात सरकार व्यस्त आहे. कर्जमाफी कशी करायची ते माझ्या काकांना विचारा असा सल्लाही अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला.
मागील पाच वर्षापुर्वी सत्तेत येण्याअगोदर २ कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ म्हणणाºयांनी या पाच वर्षात आहे त्या युवकांच्या नोकºया घालविल्या़ नोटबंदीने व्यापाºयांना देशोधडीला लावले़ केवळ आश्वासनांचा पाऊस पाडून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप-शिवसेनेच्या सरकारनं या पाच वर्षात केले़ त्यामुळे भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.