ऑनलाइन टीम
सावंतवाडी, दि. ५ - नारायण राणेंविरोधात एल्गार पुकारुन राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणारे आमदार दीपक केसरकर यांनी मंगळवारी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केसरकरांच्या हातावर शिवबंधनाचा धागा बांधला.
नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात दहशतवाद पसरवल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी केसरकर यांनी औपचारीकरित्या शिवसेनेत प्रवेश केला. केसरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. नारायण राणे व त्यांच्या समर्थकांच्या गुंडगिरीमुळे कोकणात दहशतवाद माजला आहे.या वाईट वृत्तीला आमचा विरोध आहे असे केसरकर यांनी सांगितले. कोकणातील मतदार जागरुक असून त्यांना शांती आणि विकास हवा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी हेच दाखवून दिले असेही केसरकर यांनी नमूद केले. आता संपूर्ण कोकणाचा दौराकरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते शिवसेनेत आणू असा शब्दही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.