ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २१ : धावपळीच्या या युगात आप्तेष्टांचाही विसर पडत असल्याने कुटुंबातही दुरावा निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत. मात्र अशा परिस्थितीत काहीजण मात्र याला अपवाद ठरत दृढ निश्चयाने निर्माण झालेले नाते घट्ट विणत आहेत याचे उदाहरण म्हणजे खामगाव तालुक्यातील आडवळणाच्या पोरज गावातील गोदावरीताई ढोण होत. यामुळेच आज ५ हजार भावांच्या ताई होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
खामगाव तालुक्यातील पोरज हे आडवळणाचे सुमारे ५०० ते ७०० लोकवस्तीचे गाव. या गावातील गोदावरीताई बोराडे आई-वडिलांना एकुलत्या. त्यांचे लग्न येथील पुरुषोत्तम ढोण यांच्याशी झाले. लग्नानंतर वृध्द आई-वडिलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाल्याने गोदावरीताई व त्यांच्या पतीने गोदावरीतार्इंच्या माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. भाऊ म्हणजे एका आईचीच दोन लेकरे ही विचारसरणी झुगारत आपलेपणाने गोदावरीतार्इंनी गावातील प्रत्येकासोबतच भावाचे नाते जपले. यामुळे रक्षाबंधनदिनी त्या गावातील सुमारे ५० जणांना राखी बांधत. या सामाजिक कार्यातूनच त्या सन २००० मध्ये कृउबास संचालक तसेच खरेदी-विक्री संस्थेवर संचालक म्हणून निवडून आल्या. यामुळे तालुक्यात त्यांचा परिचय वाढल्याने बंधुत्वाचे नाते सुध्दा वाढले.
यामुळे बाहेरगावी राखी बांधण्यासाठी जावू शकत नसल्या तरी त्यांनी नियमितपणे राखी पाठविणे सुरु ठेवले आहे. या बंधुत्वाच्या नात्यामुळे आजरोजी त्यांनी सुमारे ५ हजार भावांना राखीच्या बंधनातून जोडले आहे. सन २००० मध्ये सुमारे ५०० भावांना त्या राखी पाठवित असत आज हा आकडा सुमारे ५ हजार पर्यंत पोहोचला आहे. या राखी वाटप कामी त्यांना पती पुरुषोत्तम ढोण, मुलगा उमेश व गणेश तसेच इतर नातेवाईकांचे सुध्दा सहकार्य मिळते. गेल्या तेरा वर्षापासून सातत्याने हा राखी पाठविण्याचा उपक्रम राबवित आहेत.