Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी बारामती म्हटल्यावर कुणाचे नाव घेतात? असा प्रश्न शरद पवारानी विचारताच बारामतीकरांनी 'शरद पवार, शरद पवार' असा जल्लोष सुरू झाला. बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा. गेल्या निवडणुकीला बारामतीकरांनी मोठे मताधिक्य दिले. सुप्रिया सुळेंना साथ दिली. आता विधानसभेची निवडणूक होत असून त्यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज
आधी इथल्या वडिलधाऱ्यांनी मला आमदार बनवले , मी काम केले . त्यानंतर अजित पवारांना निवडून दिले. अजित पवारांना संधी दिली. युगेंद्र उच्च विद्याभुषित आहे, परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यांच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक आहे. ठिकठिकाणी फिरुन माहिती घेत आहेत. ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आता पुढच्या पिढीची गरज आहे. बारामतीमध्ये ते समाजकार्य करतात. बारामतीकरांचा विकास करण्याची क्षमता युगेंद्र यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. युगेंद्रला निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीकरांना केले.
दरम्यान, महाराष्ट्र काय चीज आहे हे देशाला लोकसभा निवडणूकीने दाखवून दिले. बहीण लाडकी आहे, त्यांचा सन्मान जरुर करा. पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचे दुसरीकडे यांच्या कालखंडात महिलांवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण जास्त आहे. महिला आणि मुली बेपत्ता आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतीमालाची किंमत मिळत नाही, कर्जबाजारी पणा वाढला. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने उद्योगपतींचे अठरा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये ते माफ करत नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली.