गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या दिमतीला एसपीओ (विशेष पोलीस अधिकारी) म्हणून स्थानिक स्तरावरील कार्यकर्ते मागील पाच-सात वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र या एसपीओंनी पोलिसांना मदत करू नये, तत्काळ काम सोडा, असे फर्मान माओवाद्यांनी जारी केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या नेटवर्कला अडचण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. घनदाट जंगलात आॅपरेशन राबविताना पोलिसांना स्थानिकांची मदत मिळावी, या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी गडचिरोली पोलीस दलात अधीक्षकांनी एसपीओ नियुक्त केले. त्यांना तीन हजारांपर्यंत मानधनही दिले जाते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून माओवाद्यांनी एसपीओंना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.भाकपा (माओवादी), अहेरी एरिया कमिटीने मंगळवारी तालुक्याच्या कमलापूर भागात पत्रके टाकून एसपीओंना काम सोडण्याचे फर्मान जारी केले आहे. यापूर्वी तीन एसपीओंची हत्या केली. तशीच अवस्था तुमचीही करू, अशी धमकी या पत्रकातून देण्यात आली आहे. कमलापूर व ताटीगुडेम, कोळसेगुडम भागांत काम करणाऱ्या १८ एसपीओ युवकांची नावेही या पत्रकात माओवाद्यांनी नमूद केली आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात काम करण्यासाठी पोलिसांना यापुढे एसपीओंची मदत मिळण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
धमकीमुळे पोलिसांच्या अडचणी वाढणार?
By admin | Published: June 11, 2015 1:11 AM