- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणूक पार पडताच महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यानुसार विद्यमान आणि माजी आमदारांसह इच्छूकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मागील पाच वर्षांत झालेल्या पक्षांतरामुळे अनेक मतदार संघातील उमेदवारीवरून युतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड मतदार संघासह गेवराई मतदार संघाच्या उमेदवारीवरून पक्ष नेतृत्वासमोर अडचणी निर्माण होणार आहे.
गेवराई मतदार संघातील पंडितांचे आपापसातील वैर सर्वश्रूत आहे. एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित आणि एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसैनिक झालेले बदामराव पंडीत यांच्यातून विस्तवही जात नसे. अशा स्थितीत गेवराईतून बदामराव पंडित यांनी २०१४ मध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. दोन पंडितांच्या वादात गेवराईतून लक्ष्मण पवार यांनी बाजी मारली होती.
दरम्यान २०१९ येईपर्यंत गेवराईत मोठे राजकीय बदल झाले. बदामराव पंडित शिवसेनेत प्रवेश केला. अर्थात त्यांनी युती होणार नाही, असं गृहित धरले असावे. मात्र भाजप आणि शिवसेनेत युती होणार हे स्पष्ट आहे. तर पवार यांनी देखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे गेवराईची जागा युतीत कोणाला मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जागा भाजपलाच ठेवल्यास, बदामराव पंडितांच काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
दुसरीकडे आमदार पवार आणि पंकजा मुंडे यांच्यात तितकेसे सौख्य राहिले नाही. गेवराई पंचायत समिती सभापतीच्या निवडीवेळी पवार आणि मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यातच आमदार लक्ष्मण पवार यांची गेल्या काही दिवसात विनायक मेटे यांच्याशी वाढलेली जवळीक जिल्ह्यातील भाजप नेतृत्वाला रुचणारी नाही. गेवराईतील भाजपच्या कार्यक्रमाच्या वेळी पंकजा यांनी याचा सूचक इशाराही दिला होता.
गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
दरम्यान बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांची मदत केली होती. त्याचा त्यांना मोबदला मिळण्याची आशा आहे. तर लक्ष्मण पवार यांना डावलून ही जागा शिवसेनेला सोडणे भाजप नेतृत्वाला मान्य होणार नाही. अशा या पेचात ही जागा कुणाच्या पदरी पडणार यावरून गेवराईत चर्चा रंगत आहे.