पुणे : विद्यार्थी संघटनेच्या (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेस भवनात शुक्रवारी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. त्यात खुर्च्या फेकण्यात आल्या. एका फोनची वायर तोडण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी कोणीही मोठा नेता किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीतच दोन्ही गटांनी दंगा घातला व नंतर ते शांतही झाले.काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अमीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त त्यांनी काँग्रेस भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच आवारात त्यांच्या अभिनंदनाचे मोठे फ्लेक्सही लावण्यात आले होते. या पदासाठी विजय चौधरी हे जुने कार्यकर्ते इच्छुक होते. याआधीच त्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते; मात्र काही नेत्यांनी त्यांना थोडे थांबा, तुमचीच नियुक्ती होईल, असे सांगितले. त्यामुळे गेले दीड वर्षे ते या पदाच्या प्रतीक्षेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक अमीर शेख यांची या पदावर नियुक्ती केली असल्याचे जाहीर करण्यात आले.त्यामुळे विजय चौधरी व त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यातच शेख यांनी काँग्रेस भवनात कार्यक्रम आयोजित केला. त्यामुळे त्यांच्या रागात भर पडली. दुपारपासूनच त्यांचे कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये जमा होत होते. त्याच वेळी अमीर शेख व त्यांच्याही कार्यकर्त्यांची तिथे गर्दी होऊ लागली. काँग्रेस भवनच्या वरच्या मजल्यावर कार्यक्रम होता. तिथे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले. त्याच वेळी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी सुरू झाली. काही वेळाने त्याचे पर्यवसान भांडणात व नंतर धक्काबुक्की होण्यात झाले. यात कार्यक्रमासाठी मांडलेल्या खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. फोनची वायर तोडण्यात आली. थोड्याच वेळात याची माहिती सर्वत्र पसरली. नेत्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना फोन केले व कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे नंतर वरचा मजला रिकामा करण्यात आला. तिथे जाणाऱ्या जिन्याच्या दरवाज्याला कुलूप लावण्यात आले. तरीही काँग्रेस भवनच्या आवारात गर्दी होती. नंतर काही कार्यकर्ते निघून गेले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दोघांनाही समज दिली असल्याची माहिती मिळाली.>विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी नियुक्तीवरून काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला असल्याची माहिती मिळाली. बरेच कार्यकर्ते बाहेरून आले होते, ते एनएसयूआयचे नसावेत असे वाटते. अधिक माहिती घेत आहे. या नियुक्त्या विद्यार्थी संघटनेच्या केंद्रीय समितीकडून होत असतात. त्यामुळे जास्त काही सांगता येणार नाही.- विश्वजित कदम, अध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेस
काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी
By admin | Published: January 21, 2017 1:00 AM