ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि.24 - जलयुक्त शिवार योजनेतील कामाचे देयक काढून दिले. त्यासाठी कमिशन
म्हणून १ लाख रुपयांची लाच घेताना तालुका स्तरावरील महत्त्वाच्या तीन कृषी अधिकाऱ्यांना बुधवारी येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. एकाचवेळी तीन अधिकारी लाच स्वीकारताना अटक झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या कारवाईने कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वर्धा तालुका प्रभारी कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी स्वप्निल अरुणराव
शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी उल्हास उद्धवराव नाडे व कृषी सहाय्यक सुनील श्यामराव सुटे अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
वर्धा तालुक्यात जलयुक्तशिवार योजनेंतर्गत सिमेंट नाला बांधकाम व खोलीकरणाच्या कामाचे बिल काढून देण्यात आले. या एकूण बिलाच्या ३० टक्के रक्कम कमिशन म्हणून प्रभारी तालुका अधिकारी स्वप्निल शेळके व उपविभागीय अधिकारी उल्हास नाडे यांनी तक्रारकर्त्या कंत्राटदाराला लाचेची मागणी केली. मात्र सदर कंत्राटदाराने ३० टक्के कमिशन लाच म्हणून देण्यास असमर्थता दर्शविली. तडजोडीअंती सदर अधिकाऱ्यांनी एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्या कंत्राटदाराने
ही बाब मान्य केली. वास्तविक, सदर कंत्राटदाराला ही लाच द्यायची नसल्याने त्याने थेट येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून तक्रार नोंदविली. यानंतर पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात वर्धेचे पोलीस उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात आज सापळा रचला. यामध्ये तक्रारकर्त्याकडून कमिशनच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपयांची लाच कृषी सहाय्यक श्यामराव सुटे याच्यामार्फत स्वीकारताना या तीनही कृषी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी कलम ७, १३(१)(ड) सहकलम १३(२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८
अन्वये शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस
उपअधीक्षक जयंत राऊत ‘लोकमत’शी बोलताना दिली. सदर कारवाई यशस्वी करण्यात
पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, सहाय्यक फौजदार प्रदीप देशमुख, श्रीधर उईके, रोशन निंबाळकर, प्रतिबा निनावे, रागीणी हिवाळे, अनुप राऊत, कुणाल डांगे, अतुल वैद्य, वैभव जगने, पल्लवी बाबडे यांचाही समावेश होता.