सातपूर : महापालिका निवडणुकीसाठी सातपूर विभागात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी तिघा अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. आता सातपूर विभागातील चार प्रभागांमध्ये १६ जागांसाठी १८५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.सातपूर विभागात १६ जागांसाठी ३२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवारी राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बेहेरे यांनी सकाळी ११ वाजता छाननी प्रक्रियेला सुरुवात केली. त्यावेळी प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या मीना डोळस यांचे जात प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग क्रमांक ९ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून परमेश्वर सदावर्ते यांचेही जात प्रमाणपत्र नसल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला, तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अपक्ष उमेदवार आशा अंबादास शेलार यांना तीन अपत्य असल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी बेहेरे यांनी सांगितले. अर्ज छाननीनंतर आता १६ जागांसाठी १८५ उमेदवारांचे अर्ज शिल्लक असून, येत्या ७ फेबु्रवारीला अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अर्ज छाननीप्रसंगी उमेदवारांच्या समर्थकांनी निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
सातपूरला तिघांचे अर्ज अवैध
By admin | Published: February 04, 2017 10:13 PM