ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील तीन मुख्य आरोपींना ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तिन्ही आरोपी नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयाचे लिपिक असून, न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ठाणे पोलिसांनी सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये सैन्याच्या काही आजी-माजी कर्मचाऱ्यांसह सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या संचालकांचाही समावेश आहे. २६ फेब्रुवारी रोजी देशभरात पार पडलेल्या सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका नागपूर सैन्य भरती कार्यालयातील रविकुमार, धरमवीर सिंग आणि निगमकुमार पांडे या तीन आरोपींनी फोडली होती. हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, त्यांच्या अटकेसाठी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वात पथक नागपूर येथे गेले होते. शुक्रवारी या तिन्ही आरोपींना अटक करून ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात सैन्यातील वरिष्ठांचा किंवा आणखी कुणाचा सहभाग आहे का, हे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट होईल. दरम्यान, सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या पाच संचालकांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या गुन्ह्यात राज्यातील आणखी काही प्रशिक्षण संस्था सहभागी आहेत का, यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
भरती घोटाळ्यातील तीन सैन्य कर्मचारी कोठडीत
By admin | Published: March 04, 2017 5:41 AM