- मनीषा म्हात्रे, मुंबई
धारावी येथील स्टेट बँक आॅफ इंडीया (एसबीआय) या बँकेच्या एटीएम कॅश व्हॅन लुटीप्रकरणी साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १५ लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर त्यांचे अन्य साथीदार चेन्नईला रवाना झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहेत. धारावी येथील ओएनजीसी बिल्डिंग जंक्शनवर गुरुवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास बँकेची कॅश व्हॅन लुटारुंनी अगदी सहजपणे पळविल्याने एकच खळबळ उडाली होती. यामध्ये दोन तरुण पैशांची पेटी घेऊन जाताना दिसत आहेत. यामध्ये फक्त तिघेच सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. यात महिलांसह १०ते १२ जणांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरोपींनी लुटीनंतर सार्वजनिक वाहनांचा वापर करत मुंबईबाहेर पळ काढला. यापैकी काहीजण साताराला गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत सातारा पोलिसांना कळविले. त्यानुसार सातारा येथून बंगळुरुच्या दिशेने चाललेल्या टुर्स अॅण्ड ट्रॅव्हलच्या बसमधून शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १५ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती सातारा गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने दिली. तर त्यांचे अन्य साथीदार चेन्नईत गेल्याचे समजले. त्यानुसार तपास पथक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. या टोळीने लुटीसाठी मास्टर प्लन तयार केला होता. लवकरच त्यांच्या अन्य साथीदारांची धरपकड होणार असल्याचे माहिती पोलिसांकडून मिळाली. (प्रतिनिधी)तामिळनाडूची टोळीधारावी येथील कॅश व्हॅन लुटप्रकरणात तामिळनाडूच्या टोळीचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कमळ रुकमान हा मास्टरमाईंड असून या टोळीतील सुरेश कुमार पांडुरंगन (४२), आरमोगन शेख (४५), यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे. या टोळीतील तीन साथीदारांकडे पैसे सोपविण्यात आले होते. ते सायन, चेंबुर, शिर्डी येथे राहणारे आहेत.