कोल्हापूर : शहरात सुरूअसलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागा (आर.टी.ओ)च्या मोहिमेला सोमवारी भक्कम बळ मिळाले. शहरातील तीन आसनी प्रवासी वाहतूक सर्व १७ रिक्षा संघटनांनी भारतीय जनता पार्टी रिक्षा संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना पाठिंबा दर्शविला. ‘पवारसाहेब आगे बडो, हम तुमारे साथ है’ अशा घोषणा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांनी दिल्या. पवार म्हणाले, तुमच्या सहकार्यामुळे ही मोहीम अधिक तीव्र राबविण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा आसनी रिक्षाचालकांनी आपला व्यवसाय शहराच्या हद्दीबाहेर करावा, असेही आवाहन त्यांनी केले. प्रामाणिकपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’चे अधिकारी निश्चितपणे राहतील, अशीही ग्वाही पवार यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधी कारवाईसाठी महापालिका आणि आरटीओ यांच्या संयुक्ततेने चार पथके स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सर्व रिक्षा संघटनेच्यावतीने बाबा इंदूलकर, विजय गायकवाड, सुभाष शेटे यांनीही विचार मांडताना, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरांतर्गत प्रवासी अवैध वाहतूक करणारी समांतर वाहतूक व्यवस्था बंद करावी, सहा आसनी वाहतूकसुद्धा बंद करावी, तीन आसनी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठी परवाना असताना आठ ते दहा प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे डिझेल रिक्षांवर कारवाई सुरू ठेवावी, ग्रामीण भागात परवाना असताना शहरांतर्गत वाहतूक केली जाते त्यांच्यावर कारवाई करावी, वायू, ध्वनिप्रदूषण थांबवावे, आदी मुद्दे मांडले.रिक्षा व्यावसायिकांनी ‘आरटीओ’ कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कारवाईचे समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या. शिष्टमंडळाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोटर वाहन निरीक्षक ए. के. पाटील, प्रदीप गुरव हे उपस्थित होते. यावेळी विजय गायकवाड, बाबा इंदूलकर, राजू जाधव, सुभाष शेटे, अरुण घोरपडे, शंकर पंडित, ईश्वर चैनी, अविनाश दिंडे, शफुद्दिन शेख, दिलीप मोरे, रमेश पोवार, मोहन बागडी, राजू शाहीर, जाफर मुजावर, अविनाश वांद्रे, अनिल लांबोरे, राजू पाटील, शेखर कोळेकर, आदी सहभागी झाले होते. दबावाला बळी पडू नकारिक्षा व्यावसायिकांनी, ‘आरटीओ’च्या कार्यालयाच्या वडापविरोधी मोहिमेचे स्वागत करीत या कारवाईबाबत दबावाला बळी न पडता प्रामाणिक रिक्षा व्यवसाय करणाऱ्या चालकांच्या पाठीशी ‘आरटीओ’ने राहावे, असे आवाहन केले; पण दबावाला बळी पडून कारवाई थांबली तर या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा यावेळी दिला.
तीन आसनी रिक्षाचालक ‘वडाप’विरोधात
By admin | Published: April 11, 2017 12:26 AM