मुंबई : देशासह राज्यातून मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी हजारो रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. अनेकांना मुंबईत राहण्याची सोय नसते, अशावेळी त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ येते. उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होऊ नयेत, म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या तीन इमारती टाटा रुग्णालयाला देण्यात आल्या. या संदर्भातील आशयपत्र केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. राजेंद्र बडवे यांना दिले. ससून गोदी प्रवेशद्वार आणि घंटा घड्याळ (बेल टॉवर क्लॉक) यांचे आज गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या कॉटन ग्रीन येथील तीन इमारतींमधील १२० घरे ही कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी देण्यात आली आहेत. १०१ रुपये भाड्याने ही घरे टाटा रुग्णालयाला देण्यात आली आहेत. मच्छीमार बांधवांना हक्काचे घर, त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा तसेच आधुनिक रुग्णालयात मोफत उपचार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, घंटा घड्याळाच्या दुरुस्तीचे काम करणारे मोहंमद इब्राहिम दमानी यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या नूतनीकरणानंतर ससून गोदी प्रवेशद्वाराला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, आशिष शेलार, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष रवि परमार आदी उपस्थित होते.बिल्डरांना एक इंचही जमीन नाही....मुंबई पोर्ट ट्रस्टची एक इंचही जमीन कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाच्या घशात जाऊ देणार नसल्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. ससून डॉक येथील मच्छीमारांना हटवले जाणार नाही. उलट मच्छीमार बांधवांना त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक सर्व सोयीसुविधा तसेच रोजगार मिळाला पाहिजे आणि मत्स्य उत्पादनाची निर्यात झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे गडकरी या वेळी म्हणाले. ससून गोदीच्या नूतनीकरण कामासाठी अतिरिक्त २७ कोटी रुपये निधी दिला जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी या वेळी दिले.
कर्करोगग्रस्तांसाठी स्वतंत्र तीन इमारती
By admin | Published: February 28, 2015 5:22 AM