नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका आॅडिटमध्ये देशातील केंद्रीय विद्यालयातील २० पेक्षा अधिक इमारती अंशत: अथवा पूर्ण असुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा इमारतींमध्ये वर्ग चालवू नयेत, असे निर्देश आता देण्यात आले आहेत.एचआरडी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जुन्या इमारतीत सर्वाधिक ८ इमारती महाराष्ट्रातील, तर आसाममधील ३ आहेत. महाराष्ट्रातील या ८ इमारतींची उभारणी १९६० मध्ये झाली होती. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये अशा दोन-दोन इमारती आहेत. त्रिपुरा, मेघालय, केरळ, पश्चिम बंंगाल, मध्यप्रदेश आणि सिक्कीममध्ये अशी प्रत्येकी एक इमारत आहे.
मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘केंद्रीय विद्यालय संघटन’ने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या माध्यमातून १० वर्षांपेक्षा जुन्या शाळा इमारतींचे आॅडिट सुरू केले आहे. या आॅडिट रिपोर्टनुसार, देशातील २१ कें द्रीय विद्यालय भवन असुरक्षित दिसून आले आहेत. यातील १८ आंशिक स्वरूपात असुरक्षित आहेत, तर तीन पूर्णपणे असुरक्षित आहेत.
पूर्णपणे असुरक्षित दिसून आलेल्या इमारती गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. या असुरक्षित इमारती बदलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यातील तीन इमारती महाराष्ट्रातील, तर एक गुजरातमधील आहे. देशभरात १,२०६ केंद्रीय विद्यालये आहेत.