अजित मांडके । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या १७ वरुन जेमतेम ३वर घसरलेल्या काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत बिकट आहे. या तीन नगरसेवकांमध्ये दोन गट तयार झाले आहेत. पक्षात कोणाचाही कुणाशी ताळमेळ नसणे, शहर अध्यक्षांचे पक्षाकडे झालेले दुर्लक्ष, सभासद नोंदणीतील शैथिल्य यामुळे सध्या शहर कॉंग्रेसला कोणीच वाली नसून पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस धडा घेतलेला नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शहर काँग्रेसची कामगिरी फारच खराब झाली. केवळ तीन नगरसेवक निवडून आले. निवडणुकीपूर्वीच पक्षाला गळती लागली आणि काँंग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देण्याची वेळ आली होती. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता. परंतु, त्यांचा राजीनामा अद्यापही स्वीकारला गेलेला नाही. आठवड्यातून कधीतरी संध्याकाळी शहर काँग्रेस कार्यालयात शिंदे हजेरी लावतात, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. एकेकाळी शहर काँग्रेसचे कार्यालय पदाधिकाऱ्यांनी भरलेले असायचे. आता केवळ दोनच कार्यकर्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आॅफीसमध्ये माशा मारत बसलेले असतात. निवडणुकीनंतर सभासद नोंदणी वाढवण्याकरिता नेते, पदाधिकारी मेहनत घेतील, अशी अपेक्षा होती. सदस्य नोंदणीकरिता शिबीर, मेळावे घेतल्याचे ऐकिवात नाही. सध्या ज्यांना पदाधिकारी व्हायचे आहे तेच केवळ कागदोपत्री नोंदणी केल्याचे दाखवत आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी ७० हजाराहून अधिकची नोंदणी झाली होती. परंतु महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना १५ हजार मतेही मिळाली नाहीत. मग हे हजारो सदस्य गेले कुठे? आता काँग्रेसचे सभासद होण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचे सूत्रांनी खासगीत सांगितले. प्रदेश पातळीवरुन कोणतीही हालचाल नाही...शहर पातळीवर पक्ष मजबूत करणे, सभासद वाढवणे, शिबीरे घेणे किंवा आंदोलन करणे याबाबत प्रदेश पातळीवरुन कोणतीही सूचना येत नसल्याची स्थानिक कार्यकर्त्यांची तक्रार आहे. प्रदेश काँग्रेसचा अंकुश नसल्याने शहर पातळीवर काँग्रेसमध्ये सर्वच स्तरावर सामसूम आहे.>तीन नगरसेवक दोन गटकॉंग्रेसचे केवळ तीन नगरसेवक अलीकडेच झालेल्या पालिका निवडणुकीत विजयी झाले; परंतु त्यांच्यामध्ये देखील दोन गट असल्याचे दिसून आले आहे.स्थायी समितीचे गणित जुळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असतांना काँग्रेसचे गटनेते यासीन कुरेशी यांनी श्रेष्ठींना तसेच अन्य दोन नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता, थेट शिवसेनेला पाठींब्याचे पत्र दिले होते. तेव्हापासून या तीन नगरसेवकांमध्ये दोन गट पडले असून, ते आजही कायम आहेत. हे तीनही नगरसेवक शहर अध्यक्षाला विश्वासात घेत नसल्याची तक्रार आहे. >स्थानिक पातळीवरील मंडळी राज्यपातळीवरस्थानिक पातळीवर काम करणाऱ्या मंडळींना निवडणुकीआधीच राज्य पातळीची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये बाळकृष्ण पूर्णेकर, संजय चौपाने, सुभाष कानडे, सुमन अग्रवाल यांचा समावेश आहे. त्यामुळे ही मंडळी स्थानिक पातळीवर लक्ष घालत नाहीत. >सर्व सामान्य कार्यकर्ता संभ्रमावस्थेतकाँंग्रेसमधील या अनागोंदीमुळे सामान्य कार्यकर्ता हताश झाला आहे. त्याच्या व्यथा ऐकण्यासाठी नेते मंडळींना जराही वेळ नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाची काय अवस्था होईल, याची कल्पनाही अनेकांना करवत नाही. >शहर अध्यक्ष आउट आॅफ कव्हरेज एरियाकाँग्रेसच्या दयनीय अवस्थेबाबत शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते आऊट आॅफ कव्हरेज एरिया होते. सध्या ते परदेश दौऱ्यावर असल्याचे त्यांच्या निकवर्तीयांकडून सांगण्यात आले. >शहर काँग्रेसमध्ये सारेकाही आलबेल आहे. यापलीकडे सध्या मला काहीच बोलायचे नाही.- बाळकृष्ण पूर्णेकर, प्रदेश सचिव तथा माजी शहर अध्यक्ष>स्थानिक पातळीवर सध्या सभासद नोंदणी सुरु आहे. काँग्रेसला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.- सुभाष कानडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस
तीन नगरसेवकांत आता दोन गट
By admin | Published: July 12, 2017 3:30 AM