मुंबई : गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मुंबई भेटीवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तब्बल ३.३७ कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये त्याबाबत माहिती विचारली असता प्रशासनाने तब्बल ५ महिन्यांनंतर त्याचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो-३ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर ११ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांची सभा झाली. त्यासाठी प्रशासनाने एकूण ३ कोटी ३६ लाख ८१ हजार ३६६ रुपये खर्च आल्याचे गलगली यांना कळविले आहे. मंडपासाठी ९३.३५ लाख खर्च सभेसाठी वॉटरप्रूफ अॅल्युमिनियम आणि टॅर्पोलिन मंडप उभारण्यात आला होते. या मंडपासाठी ९३ लाख ३५ हजार ७० रुपये खर्च झाला. मेसर्स प्रताप डी. टकाक्कार अॅण्ड कंपनी यांना हे काम देण्यात आले होते. मेसर्स जेस आयडियाज प्रायव्हेट लिमिटेड कंत्राटदाराने खुर्च्या, टेबल्स, सोफा, पोडियम, कार्पेट, टीपॉय, केमिकल टॉयलेट, गेट, बॅरिकेड्स, रेलिंग, क्लॉथ पार्टिशन, फुलांचे डेकोरेशन आणि पिण्याच्या पाण्यावर १ कोटी १२ लाख ९७ हजार १०४ रुपयांचे बिल लावले. तर इलेक्ट्रिकल सिस्टीम, व्हिडीओ हॉल आणि रिले व्यवस्थापनासाठी ७१ लाख ६७ हजार ४६५ रु पये मेसर्स श्री कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. सभेच्या जाहिरातीसाठी २० लाख ८५ हजार ६४७ रुपये खर्च करण्यात आले. एमएमआरडीएच्या मालकीचे मैदान असल्याने त्यासाठी कोणताही खर्च आला नाही. या वेळी ७३ हजार ५०० चौरस मीटर जागा सभेसाठी तर ३६,५०० चौरस मीटर जागा वाहनतळासाठी आरक्षित करण्यात आली होती. माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ अन्वये माहिती देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असताना प्रशासनाने सभेच्या खर्चाचा तपशील देण्यात ५ महिने विलंब केला. त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना राज्य सरकारने पंतप्रधानांच्या सभेसाठी कोट्यवधींचा खर्च करणे अव्यवहार्य तसेच जनतेच्या पैशांचा गैरवापर करण्यासारखे असल्याचे अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)- या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत ३ हजार माहिती पुस्तिका (ब्रोशर्र्स) बनविल्या होत्या. त्याच्या एका प्रतीसाठी १११ रुपये याप्रमाणे एकूण ३ लाख ३३ हजार ९०० रुपये खर्च करण्यात आले. तर पोडियम लोगो, बॅनर्स, स्टेज बॅकड्रॉप, वेलकम, डायरेक्शन आणि थँक यू बोर्डसाठी ३४ लाख ६२ हजार १८० रु पये खर्च झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.एमएमआरडीए मैदानावर झालेल्या या सभेची माहिती देण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी लागल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले आहे. या सभेसाठी ३ कोटी ३६ लाख ८१ हजार ३६६ रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.
पंतप्रधानांच्या सभेसाठी तीन कोटींचा खर्च
By admin | Published: March 25, 2016 2:41 AM