मुंबई : येत्या 6 ऑक्टोबरपासून अरबी समुद्र खवळलेला राहणार असून भारतीय मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.
देशात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे तामिळनाडू, पाँडीचेरी आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागात, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आजपासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्रामध्ये येत्या 6 ऑक्टोबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच या काळात मोठ्या लाटा उसळणार असल्याने समुद्र किनाऱ्यापासूनही दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.