पुणे : पूर्ववैमनस्यातून दोन जणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना कोथरूड पोलिसांनी जेरबंद केले असून, ही घटना मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास कोथरूड बसथांब्याच्या मागे घडली होती. सागर चंद्रकांत कामठे (वय ३०, रा. श्रमिक वसाहत, वनदेवी मंदिराजवळ, कर्वेनगर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन कृष्णा वाडकर (वय २४, रा. श्रमिक वसाहत, वारजे), सचिन लक्ष्मण वरक (वय २०), पवन नामदेव गोरखे (वय २१, रा. गणेशनगर, एरंडवणा) यांना अटक करण्यात आली आहे. कामठे त्यांचा कामगार संभाजी फाटक यांच्यासह मोटारसायकलवरून कोथरूड गावठाणाकडे जात होते. त्या वेळी आरोपी सचिन वाडकर, वरक आणि गोरखे हे दुचाकीवरून आले. त्यांनी आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या रागामधून कामठे यांना ‘तुला रात्री जास्त मस्ती आली होती का?’ असे म्हणत हातातील तलवारीने डोक्यात वार केला. गाडीवरून उडी मारून पळालेल्या कामठे यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारले. तेव्हा ते खड्ड्यामध्ये पडले. त्यांना दगडाने आणि रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.पसार झालेले आरोपी चांदणी चौकात येणार असून, तेथून मुंबईला जाणार असल्याची माहिती उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाघमारे, सहायक फौजदार ए. ए. शेख, विलास जोरी, ज्योतिबा पवार, विनायक पाडळे यांनी सापळा लावून आरोपींना जेरबंद केले.
प्राणघातक हल्ला करणारे तीन जण जेरबंद
By admin | Published: September 22, 2016 2:03 AM