जालना : वीज पुरवठा सुरळीत नसल्याने डिझेल पंपाद्वारे पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच विहिरीत उतरलेल्या बाबासाहेब बापूराव वाभळे (५५), रामेश्वर बाबासाहेब वाबळे (२८) व अर्जुन साहेबराव धांडे या तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला. परमेश्वर बाबासाहेब वाबळे , अशोक बापूराव वाबळे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
दैठणा येथे बाबासाहेब बापूराव वाबळे यांची २५ एकर शेती असून, रबी हंगामात त्यांनी कपाशी आणि ज्वारी पेरली आहे. सध्या बहुतांश ग्रामीण भागात महावितरणचा वीज पुरवठा खंडीत असल्याने पिकांना पाणी देण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. बाबासाहेब यांनी दोन दिवसांपूर्वीच डिझेल पंप विकत घेतला होता. या पंपाद्वारे पिकांना पाणी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बाबासाहेब, रामेश्वर आणि अर्जुन हे मंगळवारी दुपारी ६ फूट व्यास आणि ७० फूट खोली असलेल्या विहिरीत डिझेल पंप सुरु करण्यासाठी उतरले होते.
पंप सुरु करताच धुर वाढल्याने तिघांचाही गुदमरुन मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी विहिरीत उतरलेले परमेश्वर आणि अशोक हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तात्काळ जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.
उशिरापर्यंत तणावमहावितरणचे अधिकारी आल्याशिवाय शवविच्छेदन करु देणार नसल्याचा पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत मृतांचे शवविच्छेदन होऊ शकले नाही.
महावितरणच्या कारभाराचे बळीमहावितरणच्या कारभाराचे हे तीन बळी ठरले आहेत. ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी आपण उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहोत.- अर्जुनराव खोतकर, राज्यमंत्री.
माहिती घेऊजिल्ह्याच्या ग्रामीण भागात नियमानुसार वीज पुरवठा केला जात आहे. घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथील घटनेची सखोल माहिती घेऊन नियमानुसार पाऊल उचलले जाईल.- अशोक हुमने, अधीक्षक अभियंता, जालना.