मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोली जिलत दोन दिवसांत तीन जिल्हाध्यक्ष देण्याचा विक्रम प्रदेश काँग्रेसने केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बदल करून असंतोष कमी करण्याचा प्रय} केला असला तरी कार्यकर्ते या बदलाने गोंधळले आहेत.
गेली पाच वर्षे हसनअली गिलानी हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 29 सप्टेंबरला गिलानी यांना बदलण्यात आले. त्यांच्या जागी त्याच दिवशी सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश अजरूनवार यांना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नेमले. अजरुनवार यांच्या नेमणुकीचा फटका बसू शकतो हे लक्षात येताच आज माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांची नियुक्ती करण्यात आली. उसेंडी हे गेली पाच वर्षे गडचिरोलीचे आमदार होते. अलिकडे ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यांना आता विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. प्रदेशाध्यक्षांच्या निकटवर्ती सगुणा तलांडी यांना सिरोंचाहून आणून गडचिरोलीत उमेदवार करण्यात आले. एकीकडे उमेदवारी मिळाली नाही आणि दुसरीकडे आपले निकटवर्ती गिलानी यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्याने उसेंडी कमालीचे नाराज झाले. उसेंडींच्या नाराजीचा फटका बसणार हे लक्षात येताच आज त्यांना अध्यक्ष करण्यात आले. गिलानी यांना प्रदेश काँग्रेसचे सचिवपद देण्यात आले. अजरूनवारही नाराज होऊ नयेत म्हणून त्यांनादेखील प्रदेश काँग्रेसचे सचिव करण्यात आले.
(विशेष प्रतिनिधी)