ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि.23 - एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड येथे उघडकीस आला. या घटनेत आईचा मृत्यू झाला. तर वडील आणि मुलगा बचावले. ही घटना चिंचवड येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.
अश्विनी सुधीर पवार (वय ६०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुधीर नथुराम पवार (वय ६२) व रोहित सुधीर पवार (वय ३०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलीस निरिक्षक शंकर अवताडे यांनी दिलेली माहिती अशी, पवार व त्यांच्या एका सहकारयाने मिळून एक कंपनी स्थापन केली होती. मात्र, त्यामध्ये नुकसान झाल्याने पवार कुटुंबिय काही दिवसांपासून तणावाखाली होते. दरम्यान, शनिवारी ही घटना घडली.
शनिवारी सकाळी सुधीर पवार यांचा पुतण्या रणधीर हा त्यांना फोन लावत होता. मात्र, फोन कुणीही उचलला नाही. त्यानंतर सायंकाळी देखील त्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला, तरीही कुणीही न उचलल्याने रणधीर यांनी घराकडे धाव घेतली. घरी आले असता घराचा दरवाजा बंद होता. घरातून कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. यासह अग्निशामक दलाच्या जवानांनीही पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. तिघेहीजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. तिघांच्याही हाताच्या नसा कापलेल्या अवस्थेत होत्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अश्विनी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यांनी सुरुवातीला झोपेच्या गोळ्या खावून त्यानंतर हाताच्या नसा कापण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सुधीर व त्यांचा मुलगा रोहित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.