विमानतळावरील साथीदाराची महत्त्वाची भूमिका : महिन्यातून दोनवेळा यायची खेप नरेश डोंगरे - नागपूर दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या उपराजधानीत तीन टोळ्या आहेत. महिन्यातून दोनवेळा नागपुरात त्या सोन्याची खेप आणतात. सोने विमानतळावरून बाहेर काढण्यासाठी विमानतळावरीलच ‘आमिर‘ महत्त्वाची भूमिका वठवत होता. परिणामी गेल्या वर्षभरात कोट्यवधीच्या सोन्याची तस्करी बिनबोभाट पार पडली, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. खास सूत्रांनुसार, इंटेलिजन्स ब्युरो(आयबी)ला त्याची कुणकुण लागल्यामुळेच सोन्याच्या तस्करीचा शुक्रवारी सकाळी पर्दाफाश झाला. दुबई मार्केटमध्ये कोणतेही कर (टॅक्स) नसल्यामुळे भारतापेक्षा तेथे सोने खूप स्वस्त पडते. त्यामुळे सोन्याची तस्करी करणारे दुबईतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. विमानतळावर कार्यरत असलेल्या एखाद्याला आमिष देऊन फितवतात आणि लाखो-करोडोंचे सोने भारतीय बाजारात आणतात. नागपुरातही सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन टोळ्या कार्यरत असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. या टोळ्या दर दोन आठवड्यांनी सोन्याची खेप नागपूर विमानतळावर उतरवतात. यापैकी एका टोळीची डील ‘आमिर‘ सांभाळतो. राजू दुबईतून सोने आणतो. तस्करांचे धाबे दणाणलेशुक्रवारी सोने तस्करीचा पर्दाफाश झाल्यामुळे सोने तस्करांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळपासूनच ‘बर्डी’च्या ठिय्यावर त्या अनुषंगाने तीव्र हालचाली झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ३५ लाखांच्या सोन्यासह पकडल्या गेलेल्या प्रदीप बोबडेंना पोलिसांच्या कारवाईपासून लगेच दिलासा मिळाला असला तरी हे प्रकरण आता कस्टमने तपासाला घेतल्याने सोने तस्करी करणारी मंडळी हादरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कस्टम अधिकाऱ्यांनी आज बोबडेंसह तिघांची प्रदीर्घ चौकशी केली. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
सोने तस्करांच्या उपराजधानीत तीन टोळ्या
By admin | Published: July 06, 2014 12:58 AM