रिसोड : फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे निमित्ताने तीन मैत्रिणी घराजवळ असलेल्या शेतामध्ये गेल्या होत्या. शेतामध्येच असलेल्या शेततळ्यातील पाण्याचा आनंद लुटण्यासाठी काठावर गेल्या असता तिघींचाही पाय मेनकापडावरून घसरल्याने पाण्यात पडल्या. त्यात तीघींचीही प्राणज्योत मालवली. हृदयाला हेलावणारी ही घटना रिसोड येथे ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३0 वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार ३ ऑगस्ट रोजी दूपारी ३.३0 वाजताच्या सुमारास रिसोड शहराच्या उत्तर दिशेस अकोला मार्गाला लागून असलेल्या गणेश गवळी यांच्या फार्महाउसमध्ये आधूनिकतेची कास धरुन केलेल्या शेतीविकासाची माहिती रिसोड येथीलच एका कृषी व्यावसायीकाला देण्याच्या उद्देशाने गवळी त्यांच्या शेतातील शेततळ्य़ाजवळ गेले त्यावेळी हा प्रकार उजेडात आला. यासंदर्भात घटनास्थळावरील चर्चा व पोलिस सुत्रांकडून प्रथमदर्शनी समोर आलेल्या माहितीनुसार रिसोड येथीलच प्रज्ञा विलास मोरे, ऐश्वर्या गणेश गवळी व शिवानी गजानन साळेगावकर या तिघी मैत्रीणी दूपारी १२ वाजताच्या सुमारास ऐश्वर्या गवळीच्या फार्महाउसमध्ये जमल्या. ऐश्वर्याच्या घरी फराळपाणी केल्यानंतर त्यांनी फ्रेण्डशिप डे साजरा करण्याच्या अनुशंगाने शेतात मनमुराद फेरफटका मारण्याचा बेत आखला. द्राक्षाच्या बागेत फेरफटका मारल्यानंतर शेतामध्ये असलेल्या शेततळ्य़ाकडे पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गेल्या. शेततळ्याभोवती असलेले मेनकापड शेवाळाने माखलेले होते. मात्र, त्याची पुसटशीही कल्पना या मैत्रिणींना नव्हती. नेमका नियतीने येथेच या मैत्रीणींचा घात केला. शेततळ्य़ाची पाहणी करतानाच पाय घसरुन तिघीही शेततळ्य़ात पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दूपारी ३.३0 वाजताच्या सुमारास ज्यावेळी गवळी यांच्याकडे शेतीची माहिती घेण्याच्या अनुषंगाने एक कृषी व्यावसायीक आला व त्याला शेततळे दाखविण्यासाठी गवळी शेततळ्य़ाकडे गेले . त्यावेळी त्यांना शेततळ्य़ात त्यांच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीनींचे मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लागलीच उपस्थितांच्या मदतीने तिघींनाही बाहेर काढून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, या तिघींचीही उपचारापुर्वीच प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सदर तीनही मैत्रिणी रिसोड येथील भारत माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नवविच्या विद्यार्थीनी आहेत.काळजाला थरकाप सुटणार्या या घटनेची माहिती वार्यासारखी शहरात पसरताच अनेकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. वृत्त लिहीस्तोवर घटनेची पोलिस स्टेशनमध्ये नोंद केली नव्हती.
तीन मैत्रिणींचा शेततळयात बुडून मृत्यू
By admin | Published: August 03, 2014 7:52 PM