ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 12 - कळमन्यातील दोन १६ वर्षीय आणि एक १७ वर्षांची मुली बुधवारपासून बेपत्ता आहेत. या तिघींनाही फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. कळमन्याच्या जुन्या वस्तीत आजुबाजूला राहणा-या दोन १६ वर्षीय मैत्रीणी शाळकरी विद्यार्थीनी आहेत. दोघींचेही आईवडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. त्यामुळे घराच्या दाराची चावी शेजा-याकडे देऊन या दोघी घरून निघून गेल्या. रात्र झाली तरी त्या परत आल्या नाही. त्यामुळे काळजीत सापडलेल्या पालकांनी त्यांची चौकशी सुरू केली. मुलींच्या मैत्रीणी, ओळखीचे व्यक्ती आणि नातेवाईक यांच्यापैकी कुणाचकडे त्या सापडल्या नाही. त्यामुळे पालकांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. महिला उपनिरीक्षक कविता कोकणे यांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलींचा शोध घेतला जात आहे. अशाच प्रकारे बुधवारी दुपारी २ च्या सुमारास एक १७ वर्षीय मुलगी घरून बाहेर गेली. काही वेळेनंतर तिने फोन करून सायंकाळी घरी परत येईल, असे पालकांना सांगितले. मात्र, रात्र होऊनही ती परत आली नाही. त्यामुळे पालकांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक सोनपराते यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.
कळमन्यातील तीन मुली बेपत्ता
By admin | Published: August 12, 2016 6:52 PM