कल्याण : मुंबईहून पाटण्याला जाणाऱ्या पाटलीपुत्र मेलच्या जनरल डब्यात सोमवारी मध्यरात्री घुसून, सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या १४ जणांपैकी ३ जणांना अटक करण्यात कल्याण लोहमार्ग पोलीस आणि कल्याण सुरक्षा बलाच्या जवानांना यश आले आहे.मंगळवारी मध्यरात्री १२.४० च्या सुमारास पाटलीपुत्र मेलमध्ये काही तरुण गटागटांनी कल्याण रेल्वे स्थानकात चढले. मेलने कल्याण रेल्वे स्थानक सोडले, तेव्हा दोन-दोन जणांच्या गटांमधील १४ तरुणांनी चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली. या प्रकरणी प्रथम इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर, तो कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बुधवारी वर्ग करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या सुमारे ४५ ते ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी दिवसभर त्या रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. अखेर, पोलिसांनी १४ दरोडेखोरांपैकी ३ जणांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या दरोडेखोरांनी हा पूर्वनियोजित दरोडा असल्याची कबुली दिली आहे. मात्र, अटक केलेल्या आरोपींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. हे दरोडेखोर २० ते २५ वयोगटांतील तरुण असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाटलीपुत्र मेलवर दरोडा टाकणारे तीन गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 4:05 AM