मुंबई : जन्मत: पाठीच्या मणक्याजवळ असलेली गाठ वाढत जाऊन तीन किलो वजनाची झाली. पण उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे राहणाऱ्या मुलीवर उपचार झाले नव्हते. गाठ पोटापर्यंत आल्यामुळे मुलीचे पालक घाबरले होते. शेवटी त्यांनी मुंबईतील सायन रुग्णालय गाठले. सायन रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ विभागाने सात तास शस्त्रक्रिया करून ही गाठ काढल्याची माहिती रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. पारस कोठारी यांनी दिली.बाळ गर्भात असतानाच मणक्याच्या शेवटच्या हाडाजवळ गाठ वाढण्यास सुरुवात होते. बाळाच्या वाढीबरोबर ही गाठ वाढत असते. आझमगढ येथे राहणाऱ्या दुर्गावती देवी यांच्या गर्भात असणाऱ्या बाळाच्या मणक्याजवळ गाठ वाढत असल्याचे दिसून आले होते. बाळ जन्माला आल्यावर गाठ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण ही गाठ काढता येऊ शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मुलीच्या वाढीबरोबर गाठीचा आकार आणि वजनही वाढत होते. मुलीला सायन रुग्णालयात आणले तेव्हा नऊ महिन्यांच्या मुलीचे वजन नऊ किलो होते. त्यात गाठ तीन किलोची होती. ही गाठ मणक्यापासून वाढत पोटात पसरली होती. हृदयातून येणाऱ्या ‘अॅओटा’ या प्रमुख रक्तवाहिनीला चिकटली होती. त्याचबरोबर यकृत, मूत्रपिंड, आतड्यांना चिकटली असल्याचे डॉ. कोठारी यांनी स्पष्ट केले. या मुलीवर सात तास शस्त्रक्रिया सुरू होती. कोणत्याही अवयवाला आणि रक्तवाहिन्यांना इजा न होऊ देता ही गाठ काढण्यात आली. सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर टीमने ही गाठ बाहेर काढली. पण शौचाच्या जागेजवळ ही गाठ असल्यामुळे तिकडचे स्नायू कमकुवत झाले आहेत. त्यामुळे शौचासाठी मुलीच्या पोटातून नळीने जागा केली आहे. पुढच्या सहा महिन्यांत स्नायूंना बळकटी आल्यावर पोटावर केलेली जागा बंद करण्यात येईल. गाठ काढल्यामुळे आता मुलगी सर्वसामान्य आयुष्य जगू शकते. तिच्या जीवाला कुठलाही धोका नाही. मुलीला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. सहा महिन्यांनी आता पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे डॉ. कोठारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >मुलीच्या वाढीबरोबर गाठीचा आकार आणि वजनही वाढत होते. मुलीला सायन रुग्णालयात आणले तेव्हा नऊ महिन्यांच्या मुलीचे वजन नऊ किलो होते. त्यात गाठ तीन किलोची होती. ही गाठ मणक्यापासून वाढत पोटात पसरली होती. हृदयातून येणाऱ्या ‘अॅओटा’ या प्रमुख रक्तवाहिनीला चिकटली होती.
मुलीच्या पोटात तीन किलोची गाठ !
By admin | Published: July 23, 2016 2:07 AM