मुंबई : स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थांसोबत करार करण्यात आले आहेत. आगामी काळात तीन लाख रोजगार निर्माण करण्याचे सरकारचे ध्येय आहे, अशी माहिती मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिली.प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मार्गदर्शन करताना शिंदे यांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी संबंधित सर्व मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला.
‘स्टार्ट अप’मध्ये आघाडी -स्किल इंडियामध्ये प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत एक कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले आहे. स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. इको सिस्टीम तयार करण्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले.