-अतुल कुलकर्णी मुंबई : सणासुदीच्या दिवसात भेसळयुक्त दूध मुंबईत येत असल्याची माहिती मिळताच अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई करत मदर डेअरी, दारणा दूध नाशिक, श्रीरंग किसनलाल सारडा, हेरिटेज फूड लि., अग्रवाल मिल्क प्रॉडक्ट अशा नामांकित ब्रॅण्डचे सुमारे साडे तीन लाख लिटर दूध जप्त केले, तर २० हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले मुलुंड नाका, दहिसर नाका, मानखुर्द नाका, ऐरोली टोल नाका या ठिकाणी मोहीम राबविण्यात आली.
हेरिटेज फूड लि. ही कंपनी फलटण (जि. सातारा) येथे असून कंपनीचे संचालक हैदराबाद येथे राहातात. रामचंद्र साखवलेकर हे या कंपनीचे व्यवस्थापन पाहातात. वाशी टोल नाक्यावर केलेल्या तपासणीत या कंपनीच्या दुधात स्टार्च आणि अमोनियम सल्फेट आढळून आले. त्यामुळे फलटण येथील कंपनीवर छापा टाकला असता, तेथे १७ लाख रुपयांची १२०० किलो भेसळयुक्त दूधपावडर सापडली.
तुर्भे एमआयडीसीतील प्रभात डेअरीमध्ये मदर्स डेअरीसाठी दूधाचे पॅकिंग केले जात होते. त्या दूधात साखरेसारखे भेसळीचे घटक आढळले. तर नाशिकच्या श्रीरंग किसनलाल सारडा यांच्या दूधात स्टार्च आढळले. अग्रवाल मिल्क भोर जि. पुणे, साईराज मिल्क प्रॉडक्ट राहता, साईराम अहमदनगर, दारणा दूध नाशिक, सूदर्शन मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट अहमदनगर, श्रीराम दूध संकलन शिरुर पुणे, ममता डेअरी हिरापूर, लक्ष्मी मिल्क या संस्थांच्या दूधात प्रमाणापेक्षा कमी स्रिग्धांश (एसएनएफ) आणि स्टार्च आढळून आले. स्टार्च वापरणे गुन्हा आहे. स्टार्चयुक्त दूध सतत पिले गेले तर त्यामुळे वजन व कोलेस्ट्रॉलही वाढते. आष्टी तालुका दूध उत्पादक सहकारी संघाच्या दूधातही स्टार्च आढळले.
तपासणीत दुधाच्या पाच ब्रँडचे नमुने कमी दर्जाचे आढळले. त्यामुळे ३ लाख ४४ हजार लिटर दूध जप्त केले तसेच दुधाच्या आठ टँकरमधील दुधात अमोनिआ सल्फेट, शुगर, माल्टोडेक्स्ट्रीन हे घातक पदार्थ आढळले. त्यामुळे हे १९ हजार २५० लिटर दूध नष्ट करण्यात आले. हे दूध ज्या जिल्ह्यातून आले होते, त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना त्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई सुरु करण्यात आली.एकाच वेळी अनेक ठिकाणी कारवाईराज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरिश बापट यांच्या मार्गदर्शनात झालेली ही मोहीम एकाच वेळी राज्यातील विविध ठिकाणी पहाटेपर्यंत सुरु होती. या धडक कारवाईमध्ये तब्बल २२७ वाहनांमधील ९ लाख २२ हजार ९२८ लिटर दूध तपासण्यात आले. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.