राजरत्न सिरसाटअकोला : देशात यावर्षी कापसाचे भरघोस उत्पादन झाले असून, आतापर्यंत ३ कोटी ८ लाख कापूस गाठींची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आणखी भरपूर कापूस शिल्लक आहे; पण तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पाच टक्केच कापूस शिल्लक आहे. सध्या बाजारात कापसाचे दरही कोसळले आहेत. मागील महिन्यात प्रतिक्ंिवटल ६,१०० रुपयांपर्यंत पोहोचलेला कापूस आता हजार रुपयांनी कमी झाला आहे.मागील खरीप हंगामात देशात १०८ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झाली होती. महाराष्ट्रात हे क्षेत्र ३८ लाख ५० हजार हेक्टर होते, तर विदर्भात १४ लाख ५० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली होती. मागील वर्षी कापसाला पोषक पाऊस झाल्याने कापसाचा उतारा एकरी ८ ते १२ क्ंिवटलपर्यंत आला. त्यामुळे कापसाचे हे उत्पादन सव्वातीनशे लाख गाठींपेक्षा अधिक होईल, असा कापूस तज्ज्ञांचा अंदाज होता. आतापर्यंत भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), खासगी व इतर मिळून ३ कोटी ८ लाख गाठींची खरेदी झाली आहे. महाराष्ट्रात ८५ लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला आहे. आतापर्यंत ६० लाख गाठी कापसाची निर्यातही झाली आहे. सध्या तामिळनाडू व आंध्र प्रदेशातील फरदडीचा कापूस सोडला, तर आणखी १० लाख गाठी चांगला एफएक्यू दर्जाचा कापूस बाजारात येण्याची शक्यता आहे.दरम्यान, मागील दोन महिन्यांत कापसाचे दर प्रतिक्ंिवटल ६,१०० पर्यंत पोहोचले होते, ते सध्या ५,१५० ते ५,३०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यावर्षी दर बऱ्यापैकी असल्याने आणखी या दरात वृद्धी होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. आता अचानक दर हजार रुपयांनी कमी झाले आहेत. कापसावर प्रक्रिया करणारे देशातील जवळपास अर्धे कारखाने बंद झाले आहेत.
देशात ३ कोटी ८ लाख कोटी कापूस गाठींची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आता पाच टक्के कापूस शिल्लक असण्याची शक्यता आहे; पण कापसाचे दर ५,१५० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत खाली आले आहे. कापूस संपत आला असून, कापसावर प्रक्रिया करणारे अर्धे कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे आता कापसाचे दर वाढण्याची शक्यता नाही.बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.