पुणे : दिवाळीच्या सुट्टीत नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेरगावी प्रवास करतात. त्यामुळे मुंबई-पुणे, सातारा या महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते. टोल नाक्यांवर रांगेतील वाहनांना टोल भरण्यासाठी तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शुक्रवारी दिली. सलग सुट्ट्यांच्या दिवशी महामार्गावर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महामार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते विकास महामंडळ,महसुल विभागाचे अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी बोलताना राव म्हणाले, की दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीची कोंडी होवू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. टोल भरण्यासाठी कुठल्याही वाहनधारकाला तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू नये, लेन कटिंग होवू नये, मोठी वाहने ओव्हर टेक करु नये, वाहनाची गती प्रमाणापेक्षा जास्त राहू नये, याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. महामार्ग पोलीसांना त्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिली जातील. सातारा रस्त्याच्या लगत अतिक्रमण करुन विविध पदार्थांची विक्री केली जाते. यामुळेही अपघात होऊ शकतो. वळणाच्या रस्त्यावर निकषाप्रमाणे सूचनाफलक असले पाहिजेत. त्याचप्रमाणे आवश्यक ठिकाणी कठडे आहेत की नाही याची खात्री करावी, अशा सूचना देखील राव यांनी दिल्या. (प्रतिनिधी)
टोल भरण्यासाठी तीन मिनिटे पुरेशी
By admin | Published: October 29, 2016 1:55 AM